रुईया ते नायर हॉस्पिटल, टोपीवाला मेडिकल कॉलेज – माझा क्लासमेट, माझा घनिष्ट मित्र, माझा सखा व आज अनिरुद्ध बापू, माझा सद्गुरु – माझा देव !
माझ्या या लाडक्या मित्राचे मित्रत्व व लाडक्या देवाचे देवत्व दोन्ही गोष्टींचा भरभरून अनुभव घेतला आहे. आज मी तुम्हाला याच्या मित्रत्वाचे किस्से सांगणार आहे व त्यामध्येही त्याचं लपलेलं देवत्व दिसणार आहेच.
सन १९७३ महिना जून. मी इंटर सायन्सच्या वर्गात रुईया कॉलेजमध्ये दाखल झालो. कॉलेजचं पहिलं वर्ष मी ठाणा कॉलेज (बेडेकर कॉलेज)मधून पास झालो. बापू मात्र कॉलेजच्या पहिल्या वर्षापासूनच रुईयामध्ये होते. मी कॉलेजमध्ये नवखा. कॉलेजचं आय कार्ड मिळालं आणि मी ग्रंथालयात गेलो. तेव्हा आम्हाला आय कार्डवर एक पुस्तक घरी नेण्यासाठी मिळत असे. त्यासाठीच मी ग्रंथालयात गेलो होतो कारण माझ्या आर्थिक परिस्थितीमध्ये सर्व टेक्सबुक्स खरेदी करणे शक्य नव्हते. ग्र्रंथालयाच्या काऊंटरवर गर्दी होती. मी बाजूला उभा राहिलो. माझ्यापासून थोड्या अंतरावर एक टेबल होते व टेबलाजवळ बापू बसलेले होते. तेव्हा माझ्या दृष्टीने अनोळखी व्यक्ती, अनोळखी मुलगा. टेबलाच्या दिशेने पाहताच मला लक्षात आलं की तो अनोळखी मुलगा मलाच ‘जवळ ये’ म्हणून खूण करत होता. चेहर्यावरून लक्षात आलं की हा मुलगा लेक्चर्सच्या दरम्यान आपल्याच वर्गात होता. म्हणजे आपला क्लासमेट आहे एवढी ओळख पटली. तरी पोटात धाकधूक! आपण कॉलेजात नवे, ह्याला एक वर्ष झालंय. रॅॅगिंग वगैरे तर करायचा इरादा नाही ना? धीर करून मी त्याच्या टेबलापाशी गेलो. त्या मुलाने मला शांतपणे धीरगंभीर आवाजात शेजारच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. तो स्वर, तो आवाजच आश्वासक होता. माझी भीती पळाली व मी मोकळ्या मनाने खुर्चीवर बसलो. आम्ही प्रथमच एकमेकांशी बोलत होतो. पण त्याला माझी सर्व ‘खबरबात’ होती. ‘तू शिरीष दातार. डोंबिवलीहून येतोस, बरोबर? ’ हे त्याचं पहिलं वाक्य. मग त्याने स्वतःची ओळख करून करून दिली. ‘मी अनिरुद्ध धैर्यधर जोशी. शिवडीला राहतो. माझे वडील डॉ. धैर्यधर हरिहरेश्वर जोशी. त्यांचा परळ विलेजमध्ये दवाखाना आहे.’ नाव ऐकूनच मी हबकलो. तेवढ्यात त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाला, ‘‘आयकार्डवर पुस्तक नेणार आहेस ना? मला माहीत आहे त्यामागचं कारण. माझ्याकडे सगळी पुस्तकं आहेत. मला लायब्ररीमधून पुस्तक घरी नेण्याची गरज नाही. तुला जर दुसरंही कोणतं पुस्तक घरी न्यावयाचं असेल तर माझ्या आयकार्डवर घेऊन जा.’’ मी अवाकच झालो. नुकतीच ओळख झालेला (माझ्या दृष्टीने) वर्गमित्र चक्क आपणहून एवढी मदत करतोय! कुणाला खरं वाटेल ? पण हे १०८% घडलंय. हा अनिरुद्ध, हा बापू असाच आहे.
मे १९८३. बापू व मी, आम्ही दोघांनी एम.डी.चा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. मी नायर हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रारची पोस्ट करीत होतो. बापूंचं पोस्टींग पूर्ण होऊन, बापूंनी नुकतीच (मे १९८३) परळमध्ये प्रॅक्टीस सुरू केली होती. रविवारचा दिवस होता. सकाळी ११ वाजता मला डोंबिवलीहून माझ्या काकांचा फोन आला. त्याकाळी डोंबिवलीहून ट्रंककॉल लावायला लागायचा. माझे वडील डोंबिवलीत रहायचे, वयस्कर होेते. ७५च्या जवळ वय होते. आदल्या रात्री त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना ठाकूर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. मी ताबडतोब नायरमधून निघालो. निघण्यापूर्वी बापूंच्या घरी फोन करून मी डोंबिवलीला जात असल्याचं सांगितलं व कारणही सांगितलं.
मी डोंबिवलीला पोहोचलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला कळलं की मधल्या काळात माझ्या वडिलांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी मुंबईला पाठविले आहे व माझे काका त्यांना घेऊन नायरलाच गेले आहेत. मी तडक तसाच परतीच्या प्रवासाला निघालो. महाप्रचंड टेन्शन. अनिरुद्धाला (बापूंना) कळविणे शक्य नव्हते. मी तासा-दीड तासानंतर नायरला परतलो. हॉस्पिटलच्या आवारातच मला समजलं की माझ्या बाबांना आय. सी. यू. मध्ये ऍडमिट केलं आहे. माझा धीरच खचला. मी लिफ्टने हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावर गेलो. तेथेच आय. सी. यू. होतं. मी धावतच आय. सी. यू.च्या दिशेने गेलो. तेवढ्यात आय. सी. यू.चा दरवाजा उघडून खुद्द बापू व डॉ. श्रीरंग गोखले बाहेर पडले. बापूंनी माझे खांदे पकडले व म्हणाले,‘‘शिरीष, बाबांची तब्येत फारच खराब होती. पण ट्रीटमेंटनंतर आता फरक पडला आहे. ‘ही इज आऊट ऑफ डेंजर.’
Dr Datar Shirish Datar2हे ऐकून माझा बांधच फुटला. मला शांत करून बापू आय.सी.यू.त घेऊन गेले. वडिलांना भेटून मी बाहेर आलो. बापू व डॉ. श्रीरंग आत आय. सी. यू. मध्ये होते. बाहेर बापूंचा ड्रायव्हर उभा होता. मला पाहताच पुढे आला व म्हणाला,‘‘साहेब, तुमच्या मित्राला जरा समजावा.’’ मी म्हणालो,‘‘का रे?’’ तेव्हा तो म्हणाला,‘‘ अहो, डॉक्टर साहेबांनी काय गाडी चालवली ? मी जीव मुठीत घेवून बाजूच्या सीटवर बसलो होतो. असं ड्रायव्हिंग मी आजवर पाहिलं नाही. अहो, शिवडीपासून नायरपर्यंत अवघ्या ७-८ मिनिटांत गाडी आणली तुमच्या मित्राने.’’ मी अवाक्. ‘हो समजावतो’ म्हणून त्याला शांत केले. तेवढ्यात बापू बाहेर आले. ‘बाबांची तब्येत आता बरी आहे. श्रीरंग पुढचं संभाळेल. मी घरी जातो’ असं म्हणून बापू निघून गेले. नंतर डॉ. श्रीरंगने सगळा उलगडा केला. माझ्या वडिलांना आय. सी. यू. मध्ये आणले तेव्हा तो ड्यूटीवर होता. आलेला पेशंट माझे वडील आहेत व मी नायरमध्ये नाही हे समजताच त्याने बापूंना घरी फोन करून सर्व कानावर घातले. बापू शिवडीमध्ये आपल्या घरी होते. फोन आल्यापासून दहाव्या मिनिटाला बापू आय. सी. यू. मध्ये होते. मित्र मित्रासाठी धावला. बापूंचं मित्रत्व अधोरेखित झालं. पण गोष्ट इथेच संपत नाही. बापूंच्या ट्रीटमेंटमुळे माझ्या बाबांचा जीव वाचला. दोन दिवसांत बाबांना मी घरी नेऊ शकलो. माझ्या वडिलांच्या तब्येतीतील फरक पाहून डोंबिवलीतील डॉक्टर ठाकूरदेखील अचंबित झाले. एक डॉक्टर म्हणून बापू कसे होते व आहेत, हेदेखील अधोरेखित झालं.
६ सप्टेंबर १९८४. आमच्या लग्नाचा दिवस. आम्ही रजिस्टर्ड लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे एक महिना आधी नोटिस दिली होती. ठाण्याहून रजिस्ट्रार स्वतः नेरळला येणार होते. आम्ही पाच तारखेला त्यांना भेटायला गेलो असता ऐनवेळी त्यांनी आपण येऊ शकत नसल्याचे सांगितले. आता काय करायचं, हा प्रश्न उभा राहिला. कर्जतला घरी आलो. अनिरुद्ध (बापू) आमच्या आधीच घरी हजर होता. सगळं समजल्यावर ‘काही काळजी करू नको रे’ म्हणाला. माझ्या सासर्यांनी धावपळ करून वैदिक विधींसाठी गुरुजींची सोय केली. सहा तारखेला आम्ही सगळे नेरळला लग्नासाठी जमलो. बापू अर्थातच बरोबर होते. लग्नाची वेळ भरत आली पण गुरुजींचा पत्ता नव्हता. त्यांना सासर्यांनी फोन केला तर ते आजारी असून येणार नाहीत असं समजलं. सगळेच जण दुविधेमध्ये पडले. आता करायचं काय ? नातेवाईक, पाहुणे मंडळी जमलेली. लग्नविधी करायचे कसे? बापू उभे राहिले. मला म्हणाले,‘‘अरे शिरीष, काळजी कशाला करतोस? जोशी गुरुजी आहेत ना! मला सर्व विधी, मंत्र माहीत आहेत.’’ बापू जोशी गुरुजी झाले. अग्नि व देव यांच्या साक्षीने बापूंनी आमचं लग्न लावलं. मित्रासाठी बापू लग्न लावणारे गुरुजी बनले.
वरील तिन्हीही अनुभवांतून दिसतं की बापू गरजू मित्रांसाठी निःस्वार्थीपणे मदतीचा हात पुढे करतो, तोही आपणहून, अकारण. अडचणींच्यावेळी लग्न लावणारा गुरुजीही बनतो व रुग्णासाठी जीवनदायी डॉक्टर. असा हा बापू म्हणून ‘बेस्टेस्ट’ मित्र व ‘बेस्टेस्ट’ डॉक्टर आहे.
‘अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो’ हेच खरं !
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥
Monday, April 6, 2015
अनिरुद्ध बापू,
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment