शाश्वत कंठी
Friday, July 29, 2016
शाश्वत कंठी
Sunday, July 3, 2016
जंबो कोळंबीच्या बीजारोपणाचा हंगाम
सुरू झाला जंबो कोळंबीच्या बीजारोपणाचा हंगाम
डॉ. विजय पां. जोशी
जंबो कोळंबीचे बीज तलावात सोडण्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. दर्जेदार मत्स्यबीज तलावात योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने सोडणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे कोळंबी बीजासंबंधीची शास्त्रीय माहिती उत्पादकाला असणे गरजेचे आहे.
साधारणतः ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे महिने तलावात जंबो कोळंबी बीज सोडण्याचे आहेत. शेतकऱ्याला शेतात वेळेवर चांगल्या दर्जाचे बीज पेरणे जसे आवश्यक व महत्त्वाचे आहे, तसेच मत्स्यशेतकऱ्याला त्याच्या तलावात योग्य बीज वेळेवर सोडणे गरजेचे आहे. यशस्वी जंबो कोळंबी शेतीकरिता कोळंबी बीज ही प्राथमिक गरज आहे. ते बीज चांगल्या दर्जाचे व निर्भेळ असायला हवे. म्हणून कोळंबी बीजाबाबत पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत ः
बीजाची शुद्धता महत्त्वाची
साधारणपणे कोळंबी शेतकरी गुजरात व महाराष्ट्रातील नद्यांमधून पकडले जाणारे बीज विकत घेतात, पण असे बीज शुद्ध नसते. आता प्रश्न असा पडतो, की कोळंबीत शुद्ध बीज असा प्रकार असतो का? तर नक्कीच असतो. आता हे कळण्याकरिता थोडी शास्त्रीय माहिती देणे गरजेचे आहे.
गोड्या पाण्यातील कोळंबी मॅक्रोब्रॅचिअम (चरलीेलीरलहर्ळीा) प्रजातीच्या अनेक उपजाती आहेत आणि या सर्व उपजातींचे बीज सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान नद्यांमध्ये आढळते व पकडले जाते. आता आपल्या राज्यात मॅक्रोब्रॅचिअम इडेला, मॅक्रोब्रॅचिअम इक्विडन्स, मॅक्रोब्रॅचिअम रूड व मॅक्रोब्रॅचिअम रोझेनबर्गी या वेगवेगळ्या उपजातींचे बीज मिळते. यापैकी केवळ रोझेनबर्गी ही मोठी वाढणारी व म्हणून कोळंबी शेतीला परवडणारी उपजात आहे. इतर सर्व उपजातींची कोळंबी केवळ पाच ते दहा ग्रॅम एवढीच वाढते. आता होते काय की, कोळंबी शेतकरी जेव्हा नदीत पकडलेले कोळंबी बीज आणतो, तेव्हा त्यात निसर्गतः या सर्व उपजातींच्या बीजाची मिसळ असते, पण दिसताना सर्व कोळंबी बीज सारखेच दिसते. म्हणजेच कोळंबी शेतकरी जेव्हा जंबो कोळंबीचे बीज आणतो, तेव्हा त्यात इतर प्रत्येक लहानच राहणाऱ्या कोळंबीचे बीज असते. परिणामी उत्पादन कमी मिळते.
एका शेतकऱ्याचे उदाहरण देता येईल- या शेतकऱ्याने आपल्या तलावात नदीतून पकडलेले जंबो कोळंबीचे पन्नास हजार बीज सोडले, पण वर्षाच्या शेवटी त्यांना जंबो कोळंबीचे पाच हजार नग मिळाले. एकूण ३०० किलो कोळंबी मिळाली. मिळालेल्या इतर छोट्या कोळंबींचे वजन प्रत्येकी तीन ते दहा ग्रॅमच्या दरम्यान होते. म्हणजेच पन्नास हजार बीजापैकी त्यांना जंबो कोळंबीचे केवळ पाच हजार नग मिळाले. इतर सर्व कोळंबी बीज मॅक्रोब्रॅचिअमच्या इतर उपजातींचे होते. अशा प्रकारचे अनुभव अनेक कोळंबी शेतकऱ्यांना आलेला आहे व येत आहे. या प्रकारात शेतकऱ्याला उत्पादन तर कमी मिळतेच, त्याबरोबर त्याचा खाद्यावरील खर्चही वाढतो, कारण बरेचसे खाद्य ही बारीक कोळंबी फस्त करते. थोडक्यात, शेतात जसे तण माजते, तसेच कोळंबी तलावात ही लहान आकाराची कोळंबी असते व ती आपल्या मुख्य उत्पादनावर अनिष्ट परिणाम करते.
आणखी एक बाब अशी, की अशा प्रकारचे बीज वाटी, माप, पसा या हिशेबाने विकले जाते, त्यामुळे किती बीज आपण घेतले व तलावात सोडले हे शेतकऱ्याला कळतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनाचे अंदाज चुकतात.
बीजाची आवश्यकता -
केवळ जंबो कोळंबीची शेती करायची असेल, तर हेक्टरी पन्नास हजार किंवा एकरी वीस हजार या प्रमाणात कोळंबी बीज साठवावे. रोहू, कटला या माशांबरोबर करायची असेल तर हेक्टरी तीस हजार किंवा एकरी बारा हजार या प्रमाणात बीज सोडावे. तलावाच्या उत्पादकतेप्रमाणे बीज साठविण्याचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते, पण आवश्यकतेपेक्षा जास्त बीज तलावात कधीही सोडू नये.
बीज दर्जेदार हवे -
बीजोत्पादन केंद्रातील बीज शेतकऱ्याने पारखून मगच खरेदी करावे. निरोगी बीज चपळ असते, याउलट रोगट बीज सुस्त असते, ते एकाच ठिकाणी शांत बसून असते, कधी कधी त्याच्या अंगावर डागही असतात.
बीजारोपणाची पद्धत -
पॅकबंद केलेले बीज लवकरात लवकर शेतकऱ्याने आपल्या तलावापर्यंत न्यावे. या करिता शक्य असेल तर स्वतंत्र वाहन वापरावे. प्रवास शक्यतोवर रात्री किंवा थंड वेळी करावा, म्हणजे बीज जगणुकीचे प्रमाण चांगले मिळते. तलावावर पोचल्यानंतर पिशव्यांमधील बीज एकदम तलावात सोडू नये तर त्यांचे अनुकूलन करून मगच तलावात सोडावे.
अनुकूलनाची पहिली पायरी म्हणजे बीज असलेल्या पिशव्या तलावात काठाशी साधारणतः १५ मिनिटे ते ३० मिनिटे तरंगत ठेवाव्यात. त्यानंतर पिशव्या उघडून तलावातील थोडे थोडे पाणी पिशव्यांमध्ये टाकावे. याकरिता भांडे किंवा पेल्याचा वापर करावा; असे केल्यामुळे तलावातील पाण्याची कोळंबी बीजाला सवय होते व नंतर बीज तलावात सोडावे. बीजाचे अनुकूलन करणे अत्यावश्यक आहे. याचे कारण म्हणजे तलाव व पिशवीतील पाण्याचे तापमान व सामू यात बराच फरक असतो. अशा वेळी अनुकूलन न करता बीज तलावात टाकले तर बीजावर ताण येऊन बीजाची मरतुक होऊ शकते. निर्भेळ, दर्जेदार व आरोग्यवान बीज व्यवस्थितपणे अनुकुलन करून तलावात सोडले तर मत्स्यशेतकऱ्याने अर्धी लढाई जिंकली असे म्हणायला हरकत नाही.
जंबो कोळंबीचे शुद्ध बीज हवेय?
जंबो कोळंबीच्या शुद्ध बीजाच्या उपलब्धतेसाठी रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात जंबो कोळंबी बीजोत्पादन केंद्र कार्यान्वित झाले असून, ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत तेथे बीज उपलब्ध असते. हे केंद्र दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत आहे.
(०२३५२) २३२९९५
(लेखक रत्नागिरीच्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी आहेत.)
छोट्या क्षेत्रातही केले यशस्वी कोळंबी उत्पादन
छोट्या क्षेत्रातही केले यशस्वी कोळंबी उत्पादन
राज्यातील बरेच मत्स्य उत्पादक जंबो कोळंबीचे उत्पादन घेण्याचे प्रयत्न करत आहेत. जंबो कोळंबीच्या शेतीकरिता मोठा म्हणजेच किमान अर्धा एकराचा तलाव लागतो, असा अनेकांचा गैरसमज आहे; मात्र मुरादपूर (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील वासुदेव रामचंद्र नार्वेकर हे केवळ 60 चौरस मीटर क्षेत्रातून गेली तीन वर्षे जंबो कोळंबीचे चांगले उत्पादन घेत आहेत.
डॉ. विजय जोशी
गोड्या पाण्यातील जंबो कोळंबी (मॅक्रोब्रॅचिअम रोझेनबर्गी) इतर सर्व जातींच्या कोळंबीच्या तुलनेत जलद वाढते. या कोळंबीला देश-परदेशात मागणी असून त्याला दरही चांगला मिळतो. ही रोगालाही सहजासहजी बळी पडत नाही. अशा अनेक कारणांमुळे जंबो कोळंबी ही संवर्धनाकरिता सर्वांत लोकप्रिय जात आहे. महाराष्ट्रातही बरेच मत्स्योत्पादक तसेच नव-नवीन उद्योजक जंबो कोळंबीच्या शेतीचे प्रयत्न करत आहेत. मोठे म्हणजे किमान अर्ध्या एकराचे क्षेत्र असेल तरच कोळंबी उत्पादन घेता येत असल्याचा अनेकांचा समज असतो; मात्र छोट्या तलावातून कोळंबीचे यशस्वी उत्पादन घेऊन मुरादपूर (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील वासुदेव रामचंद्र नार्वेकर यांनी हा समज खोटा ठरविला आहे.
श्री. नार्वेकर यांचा मूळ व्यवसाय सोनारकीचा. ते चांगले आंबा बागायतदारही असून त्यासोबत नारळ, लिंबू आदी फळांची लागवडही त्यांनी केली आहे. त्याला जोड म्हणून गेल्या तीन वर्षांपासून ते आपल्या शेतातील तळ्यात जंबो कोळंबी संवर्धन करत आहेत. तळ्याची लांबी, रुंदी आणि खोली अनुक्रमे दहा मीटर, सहा मीटर आणि दोन मीटर आहे.
सुरवातीला त्यांनी मुंबईतून सायप्रिनससारखे मासे आणून तळ्यात पाळले होते. त्यानंतर जंबो कोळंबीची माहिती मिळाल्यावर त्याचे पालन तीन वर्षांपूर्वी सुरू केले. रत्नगिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातून जंबो कोळंबी उत्पादनाविषयीचे तांत्रिक मार्गदर्शन त्यांनी घेतले.
तळ्याचे व्यवस्थापन
श्री. नार्वेकर यांनी तळ्याच्या तळाशी मातीचा 30 सें.मी. जाडीचा थर टाकला आहे. प्रति वर्षी संपूर्ण तळे रिकामे करून तळ उन्हात तापवला जातो. त्यानंतर तळ्यात दोन घमेली शेणखत, दोन किलो युरिया आणि तीन किलो चुना टाकला जातो. त्यानंतर ते पाण्याने भरण्यात येते. त्यात प्लवंगांच्या वाढीकरिता 10-12 दिवसांचा अवधी दिला जातो. जंबो कोळंबीचे एक हजार शुद्ध बीज सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातून आणले जाते. बीजाचा प्रवासाचा कालावधी केवळ दीड तास असल्याने बीजाची जगणूक 100 टक्के मिळते. या बीजाचे अनुकूलन करून ते तळ्यात सर्वत्र विखुरले जाते. हे बीज ऑगस्ट महिन्यात सोडले जाते. तीन महिन्यांनी पुन्हा एकदा शेणखत व प्रत्येकी एक किलो युरिया आणि चुना तळ्यात दिला जातो. तळ्यात श्री. नार्वेकर यांनी कमळाची रोपे लावली असल्याने तळे सुशोभित तर झाले आहेच, शिवाय कोळंबीला लपण्यास चांगला आसरा निर्माण झाला आहे. मे महिन्यात संपूर्ण कोळंबी, पाणी काढून तळे रिकामे केले जाते.
खाद्य व्यवस्थापन
कोळंबीला खाद्य देण्यासाठी श्री. नार्वेकर यांनी तळ्यात तीन ठिकाणी "फीड ट्रे टांगून ठेवले आहेत. त्यामध्ये सकाळी सहा वाजता व संध्याकाळी सहा वाजता खाद्य ठेवण्यात येते. कोंडा, भुसा, भाकरी, भात, भुशी, जवळ्याची भुकटी, कांडी खाद्य आणि कोंबडीचे आतडे अशा प्रकारचे खाद्य कोळंबीला दिले जाते. हे सर्व सहज उपलब्ध आणि स्वस्त आहे. "फीड ट्रे'मध्ये उरलेले खाद्य दुसऱ्या दिवशी काढून ट्रे स्वच्छ करून नवे खाद्य भरून तळ्यात टांगले जातात.
पाण्याचे व्यवस्थापन
कोळंबीची वाढ भरपूर होत असल्यामुळे दर पंधरा दिवसांनी तळ्यातील पाणी बदलले जाते. तळ्यातील 30 टक्के पाणी काढून तेवढेच पाणी नव्याने भरले जाते. काढलेले पाणी आंबा बागेला दिले जाते. असे केल्यामुळे तळ्यातील पाण्याचा दर्जा चांगला राहतो. दहा महिन्याच्या (ऑगस्ट ते मे) संवर्धन कालावधीत कोळंबी जगणुकीचे प्रमाण सुमारे 50 ते 70 टक्के एवढे मिळते. प्रत्येक कोळंबीची लांबी सरासरी पाच इंच तर वजन सुमारे 50 ते 60 ग्रॅम (सरासरी 56 ग्रॅम) एवढे मिळत असल्याचा श्री. नार्वेकर यांचा अनुभव आहे. सहा महिन्यांचा संवर्धन कालावधी गेल्यानंतरच मोठ्या कोळंबीची काढणी केली जाते. गेली तीन वर्षे त्यांना प्रति वर्षी सुमारे चाळीस किलोपर्यंत कोळंबी उत्पादन मिळते आहे. या कोळंबीची चव सागरी कोळंबीपेक्षाही चांगली असल्याचे ते सांगतात.
अर्थशास्त्र
श्री. नार्वेकर यांना आतापर्यंत छोट्या क्षेत्रातही चांगले उत्पादन मिळत आहे; मात्र त्यांनी त्याची विक्री केलेली नाही. घरात खाण्यासाठी, तसेच शेजारीपाजारी, नातेवाईक आदींना देण्यासाठी त्यांनी त्याचा वापर केला आहे; मात्र बाजारभावानुसार त्यांच्या उत्पादनाचे आर्थिक गणित मांडता येऊ शकेल. त्यांना मिळणारे उत्पादन सुमारे चाळीस किलो आहे. स्थानिक बाजारात विक्री केल्यास जंबो कोळंबीची किंमत प्रति किलो सव्वाशे ते दीडशे रुपये आहे. किमान सव्वाशे रुपये हिशेबाने चाळीस किलो कोळंबीपासून पाच हजार रुपये उत्पन्न मिळते. श्री. नार्वेकर वापरत असलेले कोळंबी खाद्य सहज उपलब्ध असलेले आणि स्वस्त आहे. तसेच व्यवस्थापनासाठीची सर्व कामे ते स्वतः करतात, त्यामुळे मजुरीचाही खर्च वाचतो. कोळंबी व्यवस्थापनासाठी त्यांना येणारा एकंदर खर्च सुमारे एक हजार रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे केवळ साठ चौरस मीटर क्षेत्रातून चार हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना कोळंबी उत्पादनातून मिळते, असे म्हणायला हरकत नाही. गेल्या तीन वर्षांचा अनुभव चांगला असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला असून यंदापासून ते व्यावसायिक उत्पादन घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी ऑगस्ट महिन्यात दोन हजार बीज तळ्यात सोडले असून दोन महिन्यांत कोळंबीची लांबी दीड इंचांपर्यंत पोचली आहे. तसेच यंदा तळ्यात अन्य कोणत्याही प्रकारचे मासे नसून केवळ कोळंबीच सोडली आहे. त्यामुळे वाढीचे प्रमाण चांगले आहे. जंबो कोळंबीच्या निर्यातीलाही चांगली किंमत मिळते. 100 ग्रॅम पेक्षा कमी वजनाच्या कोळंबीला 150 ते दोनशे रुपये किलो तर 100 ग्रॅम पेक्षा जास्त वजनाच्या कोळंबीला तीनशे ते चारशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतो. जंबो कोळंबी संवर्धनाकरिता प्रत्येक वेळी खूप मोठे क्षेत्रच आवश्यक आहे असे नाही, तर काळजीपूर्वक व्यवस्थापन केल्यास
लहान
क्षेत्रातही कोळंबी संवर्धन करणे शक्य आहे हे श्री. नार्वेकर यांच्या उदाहरणातून सिद्ध होते. कोकणात बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. तसेच घाटावर अनेक ठिकाणी शेतामध्ये छोटी छोटी पाणथळ क्षेत्रे असतात. काही ठिकाणी कोणतीही पिके घेणे शक्य नसते; मात्र यापैकी कोणत्याही ठिकाणी क्षेत्र लहान असले तरीही जंबो कोळंबी संवर्धन यशस्वीपणे करणे शक्य आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे.
- श्री. नार्वेकर 9423293062
- डॉ. जोशी 9423291434
(लेखक रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)
क्षणात जाणून घ्या, कशी करावी कोळंबी शेती…
क्षणात जाणून घ्या, कशी करावी कोळंबी शेती…
शेती हा बिन भरवशाचा उद्योग असल्याच म्हटलं जात. बहुतांश प्रमाणात निसर्गावरच सगळे अवलंबून असते आणि एकदा का निसर्गाने पाठ फिरविली कि मग पदरी निराशा पडते. पण, जर उपलब्ध जागेत योग्य नियोजन करून त्याला जर मेहनितीची जोड दिली तर कोळंबी शेती नक्कीच फायदेशीर ठरू शकते. वातावरणीय बदलाचा परिणाम समुद्री जीवांवर होत असल्याच सत्य आपण जाणतोच. कदाचित म्हणूनच कोळी बांधवांना मासेमारीसाठी समुद्रात खोलवर जावे लागत आहे. यावर, तोडगा शोधायचा झाल्यास कोळंबी शेती हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
मुख्यत्वे कोकणात मत्स्य शेती केली जाते. मुंबई नजीक असलेल्या पालघर, डहाणू परिसरात “कोळंबी शेती” करण्यावर भर दिला जात आहे. कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अश्या विविध जिल्ह्यांमध्ये कोळंबी शेती केली जात आहे. दर्जेदार कोळंबी ला परदेशात आणि मोठ्या हॉटेल्स मध्ये मागणी असल्यामुळे चांगला भाव मिळतो, तसेच मागणी लक्षात घेत निर्यात केली जाते.
तलाव आणि पाणी
कोळंबी शेती करण्यासाठी आवश्यक बाब म्हणजे जागा आणि पाणी. कमीत कमी दहा गुंठ्याच्या जागेतही तलावाची निर्मिती करून कोळंबी शेती करता येऊ शकते. अतिरिक्त पाणी, शेती आणि इतर कारणाने क्षारपड आणि नापिक झालेल्या जमिनीत तळे खोदून या कोळंबीचे उत्पादन घेता येते. महत्वाची बाब म्हणजे तलावाला एका जागी उतार असावा. यामुळे पाणी बदलणे सोयीचे होते आणि तयार उत्पादन बाहेर काढण्यास मदत होते. तलावाच्या तळाशी चिकणमातीचा लेप लावणे गरजेचे आहे. कोळंबी शेती करताना जमिनीचा सामू महत्वाची भूमिका बजावतो. मातीतील सामूचे प्रमाण हे पाहून शास्त्रीय परीक्षेनंतरच जागेची निवड करावी. तलावाची निर्मिती करताना पाण्याची उपलब्धता खूप गरजेची आहे. उपलब्ध पाण्यात क्षार किती प्रमाणात आहे याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तलावाची रचना, माती सामू, पाणी, क्षार अशा तांत्रिक गोष्टींसाठी कृषी विद्यापीठातील आणि रत्नागिरी येथील सागरी जीव संशोधन केंद्रातील तज्ज्ञ मदत करतात.
उत्पादनाची पद्धत
कोळंबीचे उत्पादन साधारणत: सात ते आठ महिन्यात येऊ शकते. काही वेळा हा कालावधी कमी अधिक असू शकतो यामुळेच, सहा महिन्यांनंतर सतत चाचपणी करणे गरजेचे असते. उत्तम कोळंबी उत्पादनासाठी महत्त्वाचं असतं उत्तम प्रतीचे बीज. जर कोळंबीचे बीज चांगले असेल तरच उत्पादन निरोगी आणि सुदृढ असेल. आणि उत्पादनाला चांगला बाजारभाव मिळेल. कोळंबीचे बीज तयार करण्यासाठी विशिष्ट वातावरण गरजेचे असते. रत्नागिरी येथील सागरी जीव शास्त्रीय संशोधन केंद्रात दर्जेदार बिजं विकत मिळतात त्याला ‘हॅचरिज’ असं म्हणतात.
जंबो कोळंबी संवर्धन
मॅक्रोब्रॅकीयम रोझनबर्गी या कोळंबीला जंबो कोळंबी, महाझिंगा, पोचा, खटवी इत्यादी विविध नावांनी ओळखतात. या जातीच्या बीजाच्या कॅरापेसवर (डोक्यावरील कवचावर) आडवे तीन ते सहा पट्टे असतात. इतर सर्व जातींच्या कोळंबीपेक्षा जलद वाढते. वर्षभरात या जातीचा नर साधारणपणे 70-100 ग्रॅमपर्यंत वाढतो, तर मादी 35 ते 70 ग्रॅमपर्यंत वाढते. ही कोळंबी अत्यंत चविष्ट आहे, त्यामुळे या कोळंबीला देशात तसेच परदेशात प्रचंड मागणी आहे, दरही भरपूर मिळतो. कृत्रिम खाद्याबरोबरच कोळंबीला कणी, कोंडा, पेंड, मासे, खाटीकखान्यातले टाकाऊ मांस, धान्यकण इ. पूरक खाद्य देता येते. ही कोळंबी गोड्या पाण्यात तसेच पाच क्षारतेपर्यंतच्या मचूळ पाण्यात वाढते. तसेच 18 ते 34 अंश सें. या दरम्यान तापमान असले तरीही जगते. जंबो कोळंबी रोगाला सहजासहजी बळी पडत नाही.
खते आणि मत्स्य अन्न
मत्स्यशेतीतील एक चांगली बाब म्हणजे सेंद्रिय पदार्थ, ज्यातून कल्शिअम, नत्र अधिक प्रमाणात मिळतं. त्याचा माशांना अन्न म्हणून उपयोग होतो. त्यामुळे पौष्टिक खतांची पिशवी पाण्यात ठेवली, पाणशेवाळ यांचा अन्न म्हणून वापर होतो. कोंबडय़ांची विष्ठासुद्धा खत म्हणून वापरली जाते.
शास्त्रशुद्ध उत्पादनासाठी उत्तम प्रकारचे अन्न वापरले जाते. भाताचा कोंडा, शेंगदाण्याची पेंड आणि सुकट हे पदार्थ साधारणत: अन्न म्हणून वापरले जातात. हे अन्न बाजारात तयार मिळते. ते कणीच्या स्वरूपात असते.
कोळंबी शेती करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी
१) जंबो कोळंबी सोबत मृगल, सायप्रीन्स तसेच इतर मांसाहारी माशाचे बीज तलावात सोडू नये.
२) मत्स्यशेतीला सुरवात करण्यापूर्वी तलावाचा तळ भेगा पडेपर्यंत उन्हात आठवडाभर तापवावा. तलावाचा तळ नांगरून घ्यावा, त्यामुळे तळातील दूषित वायू बाहेर निघून जातात.
४) काही वेळेला तलावातील सगळे पाणी काढून तलाव रिकामा करणे शक्यन नसते. अशा वेळी तलावातील पाणवनस्पती काढून टाकावी लागतात. बांधाच्या उतारावरील वनस्पती त्या पाण्यात बुडण्यापूर्वी काढाव्यात. बांधाला बळकटी आणणाऱ्या वनस्पती उदा. हरळी, बांधावर ठेवावी.
५) तलावातील उपद्रवी मासे नष्ट करावेतच. याकरिता वारंवार जाळी फिरवून असे मासे काढून नष्ट करावेत.
६) तलावाच्या बांधावर बांधाच्या उंचवट्यापासून साधारण 25 ते 30 सें.मी. खाली योग्य त्या व्यासाची ओव्हर फ्लो पाइप बसवावा, जेणेकरून पावसाळ्यात तलावात जमा होणारे जादा पाणी या पाइपमधून बाहेर जाईल. या पाइपला आतून जाळी लावणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे तलावातील मासळी बाहेर जाणार नाही.
जर पाण्याचा नियमित पुरवठा असेल किंवा उत्तम जलसाठा असेल तर कोळंबी शेतीत मेहनत केल्यावर फायदाच फायदा आहे.
मत्स्यशेती प्रशिक्षण देणा-या संस्था :-
नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय सेमिनरी हिल्स, नागपूर
कॉलेज ऑफ फिशरी सायन्स, तेलंगखेडी, नागपूर
पशुवैद्यक महाविद्यालय परळ, मुंबई
सागरी जीव संशोधन केंद्र, रत्नागिरी
Saturday, July 2, 2016
पावसात अशी काळजी घ्यावी
जेवण करण्यात आणि ते पचविण्यात जठराची मुख्य भूमिका असते. पावसाळ्यात जठराग्नी मंद होतो. म्हणूनच या काळात जास्त जेवल्यास ते नीट पचत नाही. म्हणूनच पावसाळ्यात पचनासंदर्भातील आजार होऊ नये यासाठी आहारकाळजीपूर्वक घेतला पाहिजे.जड जेवण टाळावे. हल्के, ताजे आणि पचनास योग्य असाच आहार घ्यावा.संध्याकाळी लवकर जेवावे. त्यामुळे पचन सुलभपणे होते.या काळात पाणी गढूळ असण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वच्छ पाणी आपण पितोय ना याची काळजी घ्यावी.अस्वच्छ पाण्याने अतिसारासह अनेक रोग होऊ शकतात.आंबे नीट धुऊन खावेत.जांभूळ आणि मक्याचे भुट्टे खाणे या काळात चांगले.पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे विशेषतः मुलांचा त्यापासून बचाव करावा.
WD
पावसाळ्यातील रोगफोड-पावसाळ्यात पाण्यामुळे चर्मरोग होण्याची शक्यता असते. सारखे पाण्यात भिजल्याने वा चिखलात गेल्याने चिखल्या होतात. त्यासाठी अशा ठिकाणी निंबाची साले रगडावीत. पिंपळाच्या पानावर तूप लावून त्याला थोडे गरम करून फोडांवर लावल्यास आराम मिळतो.कोरडा खोकला-एलर्जी व थंडीमुळे हा खोकला होतो. त्यासाठी एंटीहिस्टेमाईनचा उपयोग करावा. तेलकट पदार्थ टाळावेत. कारण त्यामुळे गळ्याला संसर्ग होऊ शकतो.सर्दी-पावसाळ्यात सर्दी होणे यात काही विशेष नाही. पण म्हणूनच सर्दी झाल्यानंतर काळजी घ्यावी. एक कप पाण्यात आले टाकून ते उकळावे. त्यात एक चमचा मध टाकून ते घ्यावे. असे दोनदा प्यायल्यास सर्दी लवकर बरी होते.